नवी दिल्ली – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोध देशभरात आंदोलन होत आहे. तर दुसरीकडे या कायद्याच्या समर्थनात मोर्चे आणि रॅली काढण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री पत्रकार परिषदेत या कायद्याविषयी बारकाईने जनतेला माहिती देत आहेत. यासोबतच विरोधी पक्ष या कायद्याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे सांगत आहेत. मध्य प्रदेशातील पथेरियाचे बसपाच्या आमदार रमाबाई परिहार यांनी पक्षाविरोधात जात या कायद्याचे समर्थन केले होते. यामुळे बसप पक्षाने रमाबाई यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी ट्वीटरद्वारे ही माहिती दिली.
शिस्तभंग केल्यामुळे आमदारावर कारवाई
मायावतींनी ट्विट केले की, “बसपा हा शिस्तबद्ध पक्ष आहे. शिस्तभंग केल्यास पक्षाचे आमदार/खासदार इत्यादींवर तत्काळ कारवाई केली जाते. यामुळे पथेरिया येथील बसपाच्या आमदार रमाबाई परिहार यांनी नागरिकत्व कायद्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना पक्षातून निलंबित केले. तसेच पक्षाच्या कार्यक्रमात भाग घेण्यास त्यांच्यावर बंदी आहे.”
कायदा मागे घेण्यासाठी राष्ट्रपतींना दिले निवेदन
मायावती यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, “बसपाने प्रथम याला (नागरिकत्व कायदा) फूट पाडणारे आणि असंवैधानिक म्हणवून विरोध दर्शविला. संसदेतही कायद्याविरोधात मतदान केले तसेच कायदा मागे घेण्यासाठी माननीय राष्ट्रपतींना निवेदन दिले. परंतु यानंतरही आमदार परिहार यांनी कायद्याचे समर्थन केले. यापूर्वीही त्यांना बर्याच वेळा पक्षासोबत चालण्याचा इशारा देण्यात आला होता.”