मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने धुळे येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या वाढवलेल्या 100 जागांवर निकाल दिला आहे. त्यात या वाढीव 100 जागांवरील प्रवेशांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जातेय.
राज्याच्या वैद्यकीय प्रवेश (Admission) प्रक्रियेदरम्यान धुळे येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात 100 जागांवर एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या महाविद्यालयात येऊन पाहणी केली. मात्र, त्याबाबत नकारात्मक अहवाल दिला. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली. यावर निर्णय देताना न्यायालयाने या जागांवर प्रवेश देण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर या जागांवरील सारे प्रवेश धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या भविष्यासमोरही एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नेमके झाले काय?
औरंगाबादच्या उच्च न्यायालयाने धुळे येथील एमबीबीएसच्या 100 जागांवर प्रवेशासाठी मुभा दिली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत या जागांचा समावेश केला गेला. पुढे दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत या जागांवर प्रवेश प्रक्रिया पार पडली. याविरोधात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या संजय कुमार आणि सरोज कुमारी गौर यांच्या खंडपीठाने या जागांवरील प्रवेशाला स्थगिती दिली.














