नवी दिल्लीः- देशात होणारी 16 वी जनगणना ही डिजिटल होणार असून अॅपच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. 2021 ची जनगणना ही 16 वी जनगणना असून ती स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना आहे. 160 वर्षानंतर जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदा अॅपमधून नागरिकांची माहिती गोळा केली जाणार आहे.
देशातील सर्व नागरिकांना बहुउद्देशीय ओळख पत्र (मल्टिपरपस आयडी कार्ड) देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. यात आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि बँक खाते यासारखी सुविधा मिळणार आहे. ही सर्व माहिती एका अॅपमधून गोळा केली जाणार आहे. देशाच्या पहिल्या डिजिटल सेन्ससवर एकूण 12 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येईल, असेही अमित शहा यांनी सांगितले. इतिहासात पहिल्यांदा अॅपमधून ही जनगणना केली जाणार असून यासाठी डुअर-टू-डुअर जाऊन लोकांच्या मोबाइलमधून ही माहिती गोळा करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
देशातील जनगणना ही दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने मार्च महिन्यात दिली होती. सेन्सस 2021 ची प्री टेस्ट 12 ऑगस्ट 2019 पासून सुरू झाली होती. ती आता या महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. जनगणना करण्यासाठी एकूण 33 लाख लोकांची मदत घेतली जाणार आहे. ही सर्व लोक घराघरांत जाऊन सर्व माहिती गोळा करतील. जनगणना एकून 16 भाषेत केली जाणार आहे. जनगणना करणे हे कंटाळवाने काम नाही. यातून सरकारच्या योजना पोहोचतात. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदनी (एनपीआर) च्या मदतीने सरकारला देशातील समस्यांची माहिती समजण्यासाठी मदत होत असते.