नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 22 हजार 842 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 244 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.
देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पावणे तीन लाखांच्या खाली आहे. कालच्या दिवसात या संख्येने गेल्या 199 दिवसातील निचांक गाठला. गेल्या 24 तासात 25 हजार 930 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 37 लाख 66 हजार 707 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 30 लाख 94 हजार 529 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 48 हजार 817 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 70 हजार 557 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 90 कोटी 51 लाख 75 हजार 348 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.















