४ जण जखमी ; पिंपळगाव गोलाईत गावाजवळील घटना
जामनेर- जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ पहूर जामनेर महामार्गावर तिहेरी अपघातात एका ६ वर्षीय चिमुकलीसह तीन जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असून सर्व जखमींना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले . मात्र यातील ६ वर्षीय जखमी मुलीला सामान्य रुग्णालयात दाखल केले असता तिला वैद्यकीय अधिकाऱयांनी मृत घोषित केले .
याबाबत सविस्तर माहिती अशी की , आज सकाळी सात वाजेच्या सुमारास जामनेर पहूर मार्गावर पिंपळगाव गोलाईत गावाजवळ रिक्षा , मोटरसायकल व आयशर या तीन वाहनांमध्ये भीषण अपघात होऊन यात मोटरसायकल वरील पावरा समाजाचे पती-पत्नी जागीच ठार झाले तर ६ वर्षीय त्यांच्या मुलीला सामान्य रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले . यामुळे पावरा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पहूर कडे जाणारी रिक्षा क्रमांक एम एच २०-३१३७ मोटरसायकल क्रमांक एम एच १७ ए पी ७६३४ वरील पती-पत्नी हे पहुर कडे जात होते तर समोरून येणारी पहुर कडून जामनेरकडे जाणारी आयशर क्रमांक एम एच४५-१६९६ या आयशर गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिली . तसेच मोटरसायकलला धडक देऊन मोटरसायकल वरील बाबूलाल पावरा व त्यांची पत्नी हे दोघे जागीच ठार झाले . त्यांची सहा वर्षाची मुलगी राधा बाबुराव पावरा हि गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तसेच यावेळी रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाने दोन पलटी घेतल्या . यात बसलेल्या रजाक गवळी साहेब, राबाई रज्जाक बिस्मिल्ला सत्तार ,रज्जाक रेहान रजाक हे अत्यंत गंभीर जखमी होऊन त्या सर्वांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले . दरम्यान अनेक दिवसापासून रस्त्याचे काम सुरू असून यामुळे हा अपघात घडला. अपघातग्रस्ताना रुग्णालयात दाखल करण्यासाठी माजी सभापती नवलसिंग पाटील बाबुराव घोगडे पहूर पेठ चे नवनिवार्चित उपसरपंच श्याम सावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना मदत केली. याबाबत अपघाताची नोंद करण्यात आली असून पहुर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ एक तपास हे करीत आहेत.














