- अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व जळगाव एमआयडीसी पोलीसांकडे तक्रार दाखल
जळगाव – जळगाव शहरातील जैन फार्मफ्रेश फूड्स लि. कंपनीचा कामगार पुरविण्याचा ठेका मिळाल्याचे भासवून एकाने सुशिक्षित बेरोजगारांसह, संस्थांना फसविल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. जैन फार्मफ्रेश फूड्स कंपनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने संबंधितांविरूद्ध जळगाव एमआयडीसी व अमरावती जिल्ह्यातील मोर्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे.
पाचोरा येथील बसस्टॅण्डजवळील स्वीपर कॉलनीतील शिवाजीनगरमधील फुलचंद चेताराम थामेत व मोर्शी येथील सागर कैलास दाभाडे यांनी संगनमत करून इतर काही साथीदारांच्या मदतीने जैन फार्मफ्रेश फूड्स लि.मध्ये रोजगार देण्याचे भासवून अनेकांना फसविल्याचे प्रकार समोर आले. जामनेर येथील मे. महात्मा ज्योतीबा फुले सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेशी भागीदारी करून संस्थेकडूनही मोठी रक्कम दोघांनी घेतल्याचे उघडकीस आले. संबंधित संस्थेने कामाचा ठेका दिला आहे का? अशी विचारणा जैन फार्मफ्रेश फूड्स लि.कडे केली असता पडताळणीअंती दोघांचे बिंग फुटले. यावेळी बनावट लेटर हेडचा वापर करून सुरक्षा रक्षक पुरविणे व हाऊस किपींग करून देण्याचा ठेका मिळाल्याचे भासवित फुलचंद थामेत,सागर दाभाडे व इतर यांनी अनेकांना फसविल्याचे समोर आले आहे. संशयीतांनी यासाठी कंपनीच्या नावाशी मिळत्या जुळत्या नावाने लेटर हेड त्यावर संचालकांच्या, व्यवस्थापकांच्या पदाचे बनावट स्टॅम्प व खोट्या सह्यांचा वापर केल्याचे आढळुन आले. असाच प्रकार दोघांनी इतरांच्या मदतीने अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे केल्याचे समोर आले आहे. यावरून जैन फार्मफ्रेश फूड्स लि. कंपनीच्यावतीने अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व जळगाव एमआयडीसी पोलीसांत संबंधीतांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जळगाव व अमरावती जिल्हा परिसरातील बेरोजगारांना तसेच रोजगार पुरविणाऱ्या संस्थांना फुलचंद चेताराम थामेत, सागर कैलास दाभाडे व इतर खोटे सांगून फसवु शकतात. त्यामुळे कुणाचीही फसगत होऊ नये, यासाठी पोलीसात तक्रार देण्यात आली आहे. संबंधितांनी भविष्यात काही गैरव्यवहार केल्यास कंपनी जबाबदार राहणार नाही असे कंपनीने तक्रारीत नमूद केले आहे.














