जळगाव.दि.27 – लॉकडाऊन कालावधीत केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून लग्न समारंभ साजरा करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.तथापि लग्न समारंभ कोणकोणत्या ठिकाणी पार पाडता येतील याबाबतचा उल्लेख आदेशात नसल्याने महाराष्ट शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय,यांच्याकडील 22 जून 2020 च्या पत्रानुसार पावसाळा सुरू झालेला असल्याने खुले लॉन्स ,विना वातानुकुलीत मंगल कार्यालय/हॉल /सभागृह तसेच घर व घराच्या परिसरात केवळ 50 लोकांच्या मर्यादेत लग्न समारंभ पार पाडण्यास नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास परवानगी देण्यात यावी असे नमुद केलेले आहे.
नागरिकांकडून अर्ज प्राप्त झाल्यास सदर अर्जाबाबत जळगाव शहरासाठी महानगरपालिकेचे आयुक्त तर इतर क्षेत्रासाठी कार्यकारी दंडाधिकारी तथा इंसिडेंट कमांडर हे आवश्यक ते हमीपत्र घेवून परवानगी देतील.परंतु प्रतिबंधित क्षेत्रांमधील मंगल कार्यालय,हॉल,सभागृह,तसेच घर किंवा घराच्या परिसरात लग्न समारंभास परवानगी मिळणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी सूचनांचे पालन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ,जळगाव अभिजित राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.