जळगाव – पाचोरा तालुक्यातील मौजे सामनेर येथील विविध कार्यकारी सोसायटी संचालित रास्त भाव दुकान व बोदवड येथील महाराष्ट्रीय सहकारी ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेचे स्वस्त धान्य दुकान असे दोन्ही दुकानांची तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्याने तहसीलदार यांच्या अहवालानुसार सदर दुकानाचे प्राधिकरण पत्र रद्द करत जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी धडक कारवाईचा बडगा उचलला आहे.अशीच धडक मोहीम जळगाव शहरात राबवून कारवाई होणे अपेक्षित आहे.

याबाबत सविस्तर असे कि, पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील विविध कार्यकारी सोसायटी संचालित रास्त भाव दुकानाची पुरवठा निरीक्षक, पाचोरा यांनी तपासणी केली असता तपासणीत दुकानदार हे लाभार्थ्यांना शासकीय दरापेक्षा जास्त दराने धान्याची विक्री करतात, ई- पॉस मशीनची पावती सुद्धा देत नाहीत. तसेच स्वस्त धान्य दुकानाचे अभिलेख सुद्धा अद्यावत ठेवलेले नसल्याचे आढळून आले आहे. त्याच बरोबर ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी असून सदर दुकानदार हे शासकीय नियमांचे वेळोवेळी उल्लंघन करित असल्यामुळे पाचोरा तहसीलदार यांच्या अहवालानुसार सदर दुकानाचे प्राधिकरण रद्द करण्यात आले आहे.
दरम्यान बोदवड येथील महाराष्ट्रीय सहकारी ग्रामीण महिला औद्योगिक संस्था मर्या. स्वस्त धान्य दुकान क्र. 3 बाबत तहसीलदार, बोदवड यांच्या कडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार सदर दुकानाची तपासणी केली असता यादीत असलेल्या लाभार्थ्यापैकी फक्त 17 ते 18 टक्के लाभार्थ्यांना धान्याचे ऑनलाईन वाटप करीत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच उर्वरित लाभार्थ्यांना धान्य केल्याबाबतचे कोणतेही अभिलेख ठेवण्यात आलेले नव्हते. सदर दुकानदार यांनी शासनाच्या नियमांना अक्षरशः धाब्यावर बसविल्याचे दिसून आल्याने बोदवड तहसीलदार यांच्या अहवालानुसार सदर दुकानाचे प्राधिकरण पत्र रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी काढले आहे. या कारवाईने “स्वस्त धान्य दुकानात काळा बाजार” करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
जळगाव शहरातही रेशनचा मोठा काळा बाजार होत असल्याचे अनेक तक्रारी आहेत. अनेक दुकानदार स्वस्त धान्य दुकाने उघडत नाही. लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही बोगस लाभार्थी दाखवून धान्य वाटप केले जाते या बाबत अनेक तक्रारी व माध्यमांमधून बातम्या प्रकाशित झाल्या तरी देखील कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तरी जिल्हा पुरवठा विभागाने जळगाव शहरात देखील दुकान तपासणी मोहीम राबवून धडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. जळगाव शहरातील दोषी रेशन दुकानांवर कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

















अशिच कार्यवाही जळगांव शहरातील दुकानांवर झाली पाहिजे़