जळगाव दि. 13 (प्रतिनिधी) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशीत विदयार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्र अभावी गैरसोय होणार नाही यासाठी तसेच कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचीत राहु नये या करीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव मार्फत विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी व तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र संबंधित विद्यार्थ्यांना समितीस्तरावरुन निर्गमित करण्यासाठी समितीस्तरावर विशेष मोहिम शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.
अर्जदार यांनी त्रुटी पुर्तता करण्यासाठी दर मंगळवारी व बुधवारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपल्या जातीदाव्या प्रकरणातील त्रुटी पुर्तता करुन आपला प्रस्ताव निकाली काढून घ्यावा असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून करण्यात आले आहे.
ज्या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांनी अधिनियम २००० मधील कलम ८ अन्वये जाती दावा सिध्द केला आहे अशा प्रकरणामध्ये त्यांच्या जातीची पडताळणी होवून वैधतेचा निर्णय घेवून जात वैधता प्रमाणपत्र तयार झालेल आहेत. अशा विद्यार्थ्यांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी समितीकडून एसएमएस (SMS) द्वारे कळविण्यात आलेले आहे.
अशा विद्यार्थ्यांनी या शिबिराच्या कालावधीमध्ये स्वतः किवा वडिल/ आई तसेच रक्ताच्या नात्यातील सख्खा भाऊ/ बहीण/ काका यांनी त्यांचे स्वतःचे टोकनपावतीसह ओळखपत्र दाखवून कार्यालयीन दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदीर समोर महाबळ जळगाव येथील कार्यालयात उपस्थित राहून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन समितीचे वतीने अर्जदार विद्यार्थी पालक यांना एन एस रायते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.