वाघारी. ता. जामनेर (वार्ताहर) :- जामनेर तालुक्यातील वाघारी येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून उघड्यावर घाण साचली असतांना गावकऱ्यांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे मात्र ग्रामपंचायतीचे सपशेल दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
कोरोनाच्या नंतरच्या काळात आरोग्य व स्वच्छता संदर्भात शासन आग्रही असतांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्वच्छ भारत अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश देत असतांना आपण पाहत अहो तर दुसरीकडे वाघारी सारख्या गावात घाणीचे साम्राज्य असतांना सुद्धा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करित आहे.मलेरिया, डेंग्यू, साथीचे आजार यासारखे होणारे आजार हे गावातील गटारी, सांडपाणी यामुळे होतात हे ठाऊक असूनही ग्रामपंचायत प्रशासन एवढा स्वछते बाबत हलगर्जी पणा कसा करू शकतात असा प्रश्न पडला आहे.
सहा दिवसा पूर्वी गावात काही ठिकाणी गटार साफ सफाई करण्यात आल्या व त्या मधील घाण रस्त्यावर आणि घरा समोर टाकण्यात आली, गटारीतून काढलेली घाण आज उचलतील, उद्या उचलतील असं गावकऱ्यांना वाटलं पण अद्यापही सदर कचरा तसाच पडल्याने सर्वत्र घाणीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही ठिकाणी तर गटारी तुटलेल्या अवस्थेत असल्याने गटारीतील सांडपाणी मुख्य रस्त्याने वाहत आहे.तरी प्रशासनाने या विषयाकडे लक्ष द्यावे असे गावातील नागरिकांनी अपेक्षा व्यक्त करत मागणी केली आहे.