पुणे – ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करणारे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आपल्याला वाईट वाटले. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कुणीही गाठू शकणार नाही, मात्र अलिकडे ‘जाणता राजा’ ही उपमाही दिली जाते. मी याचाही निषेध करतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज हेच आहेत. त्या सो कॉल्ड जाणत्या राजांना ही उपमा कुणी दिली माहीत नाही, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. या वेळी उदयनराजे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवरही जोरदार टीकास्त्र सोडले.
गोयल नावाच्या कुण्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मी ते वाचलेले नाही. वास्तविक या जगात महाराजांच्या उंचीपर्यंत कुणीही जाऊ शकणार नाही. एक युगपुरूष कधीतरी जन्माला येतो. ते म्हणजे शिवाजीराजे. तुलना करणाऱ्या लोकांची बुद्धी गहाण ठेवली आहे का?, असा सवाल करत तुलना करणाऱ्या या पुस्तकामुळे आपल्याला वाईट वाटल्याचे उदयनराजे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच या तुलनेमुळे वाईट वाटल्याचेही ते म्हणाले.