नवी दिल्ली – लष्करप्रमुख बिपीन रावत हे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) होणार आहेत. केंद्र सरकारने रविवारीच सीडीएस पोस्टसाठी वयोमर्यादा वाढवली होती. सीडीएसचे पद हे तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांपेक्षावरील हुद्याचे असणार आहे.
बिपीन रावत हे ३१ डिसेंबर रोजी लष्करप्रमुखांच्या पदावरून निवृत्त होणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने लष्करी सेवा व नियम कायद्यात सुधारणा केल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाने २८ डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेत (सीडीएस) ६५ वर्षांपर्यंत सेवेत राहू शकतात असे नमूद केले आहे. केंद्र सरकारला आवश्यकता वाटल्यास सीडीएस प्रमुखांना मुदतवाढ देण्यात येऊ शकते. जनरल बिपीन रावत लष्करप्रमुख पदावरून मंगळवारी, ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. सध्याच्या नियमांनुसार, तिन्ही दलांचे प्रमुख वय ६२ वर्ष अथवा तीन वर्षांपर्यंत कार्यरत राहू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने २४ डिसेंबर रोजी सीडीएस पद आणि त्यांचे कर्तव्य व नियमांना मंजुरी दिली होती. सीडीएस पद सोडल्यानंतर संबंधित व्यक्तिला कोणतेही पद स्विकारता येणार नाहीत. भूदल, हवाई दल आणि नौदल या तिन्ही सैन्य दलाचे सीडीएस प्रमुख सल्लागार असणार आहेत. भारतासमोर असणाऱ्या संरक्षणविषयक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तिन्ही सैन्य दलात ताळमेळ वाढवण्याची जबाबदारी चीफ ऑफ डिफेंस स्टाफची(सीडीएस) असणार आहे.