चाळीसगाव – आगामी विधानसभा निवडणुकांसाठी अनेकांनी गुडघ्याला बहीण बांधले असून हवशे नवशे निवडणुकीच्या तयारीला लागले आहे . जळगाव जिल्ह्यात मोठा विधानसभा मतदार संघ म्हणून चाळीसगाव मतदार संघाकडे पहिले जाते . कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या चाळीसगाव मतदारसंघ आता भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे.
खा. उन्मेष पाटील यांनी लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर आता येथील राजकारणाला कलाटणी मिळाली असून भाजपतर्फे मतदार संघातून खासदार पत्नी संपदा पाटील, मंगेश चव्हाण , चित्रसेन पाटील आदींसह ३५ जणांनी मुलाखती दिल्या असून संपदा पाटील आणि मंगेश चव्हाण या संभाव्य उमेदवारांमध्ये खरी चुरस दिसून येत आहे . आपल्या आमदारकीच्या रिक्त जागेवर उन्मेष पाटील संपदा पाटील यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवू शकतात. उमंग परिवाराच्या माध्यमातून हजारो महिलांसाठी विविध कार्यक्रम संपदा पाटील यांनी घेतले आहे . त्या महिलांमध्ये लोकप्रिय असल्याचा फायदा त्यांना निवडणुकीसाठी होऊ शकतो असे बोलले जात आहे.संपदा यांचे मूळगाव अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे माहेरी कुठलाही राजकीय वारसा नाही. 2005 मध्ये उन्मेष पाटीलांशी त्यांचा विवाह झाला. सासरी आल्यानंतर वातावरणात बदल झाला. सासरे भैय्यासाहेब पाटील यांना सरपंच पदाचाअनुभव व सामाजिक क्षेत्रातील वातावरणामुळे तसेच पती उन्मेष पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे सौ. संपदा पाटील यांचा नेतृत्व गुण विकसित झाला. पतीच्या समाजकारणारचा वारसा समर्थ सांभाळत असताना २००७ मध्ये उमंग समाज शिल्पी मंडळाची स्थापना करून साधारण दहा हजार महिला भगिनींची एक समृद्ध चळवळ उभी केली या चळवळीच्या माध्यमातून महिला भगिनींच्या क्षमता विकासाला प्राधान्य देणारे,व्यक्तिमत्व विकासाला प्रेरित करणारे,नेतृत्व गुणास समृद्ध करणारे तसेच पर्यावरण समृद्धी,संगणक साक्षरता आदी विषयीचे विधायक उपक्रम राबविण्यात आले.या जोडलेल्या साधारण दहा हजारांहुन अधिक परिवाराच्या माध्यमातून सामाजिक,सांस्कृतिक,आरोग्य आदी क्षेत्रातील कार्यक्रमातून आपल्या कामाचा ठसा उमटविला तर दुसरीकडे खा. उन्मेष पाटील यांचे कधीकाळी समर्थक आणि मित्र असलेले मंगेश चव्हाण यांच्यात विधानसभा निवडणुकीमुळे दुरावा निर्माण झाल्याचे म्हटले जाते .युवानेते मंगेश चव्हाण यांनी वेगळी वाट शोधली असून मतदार संघात शालेय साहित्य वाटपापासून ते धार्मिक सांस्कृतिक अशा विविध लोकोपयोगी कार्क्रमांचे यशस्वी आयोजन करून आपल्या कामांची चुणूक दाखवून दिली आहे . मंगेश चव्हाण हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून येत आहे. पक्षश्रेष्ठीही त्यांच्या नावाबाबत अनुकूल आहेत . चाळीसगावकरांमध्ये विविध समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल चाळीगावकरांमध्ये त्यांच्या कामांविषयी समाधानाचे वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . त्यांच्या विविध कार्यक्रमांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने आणि त्यांना विकासाची दृष्टी असल्याने यंदा मंगेश चव्हाणचं भावी आमदार होणार असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे . मंगेश चव्हाण यांनी विविध गावांना भेटी देऊन आस्थेवाईकपणे चौकशी करून विविध समस्यां प्रश्नांचे ते निराकरण करीत असल्याने विशेषतः तरुणाईमध्ये मंगेश चव्हाण लोकप्रिय झाले आहेत .
त्यांच्या विविध कार्यांची दखल नागरिक घेत असल्याने आणि त्यांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना भाजपाकडून तिकीट मिळणार असल्याची खात्री त्यांच्या समर्थकांना आहे. त्यामुळे मंगेश चव्हाण आणि मित्र परिवार जोमाने कार्याला लागला आहे. सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून मंगेश चव्हाण यांची ओळख निर्माण झाली आहे . आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ते चाळीसगाव मतदार संघाचा विविध विकासकामे करून कायापालट करू शकतात याची नागरिकांना खात्री वाटत असून मंगेश चव्हाण यांच्यासारख्या उमद्या व्यक्तिमत्वाला भाजपने संधी द्यावी अशी मागणी होत आहे . तर दुसरीकडे चाळीसगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार असल्याचे समजते . अर्थात तुल्यबळ लढतीचे संकेत असले तरी खान्देशात वाढत चाललेला भाजपचा प्रभाव पाहता चाळीसगाव मतदारसंघातून भाजपचे संभाव्य उमेदवार मंगेश चव्हाण यांचे पारडे जड आहे .
पक्षनिहाय इच्छुक उमेदवार
भाजप – उन्मेष पाटील यांचे मित्र मंगेश रमेश चव्हाण, बेलगंगाचे चेअरमन चित्रसेन पाटील, डॉ. विनोद कोतकर, ऊसतोड मजुरांचे ठेकेदार किशोर पाटील ढोमणेकर, जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, पं.स.चे उपसभापती संजय भास्कर पाटील, सतीष दराडे, माजी जि.प. सदस्य धर्मा वाघ, डॉ. सुनील राजपुत.
राष्ट्रवादी – राष्ट्रवादीकडून माजी आमदार राजीव देशमुख, काँग्रेसकडून अशोक खलाणे, बाळासाहेब भावराव पाटील, धनंजय चव्हाण, अॅड. वाडीलाल चव्हाण तर वंचितकडून माजी जि.प.सदस्य सुभाष हिरालाल चव्हाण, डॉ. मोरसिंग राठोड, डॉ. तुषार राठोड राकेश जाधव.