अमळनेर – अमळनेर पंचायत समितीने केंद्र शासन व राज्य शासकीय योजनांची घरकुले पूर्ण करण्यात नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या एकाच वर्षात पंचायत समितीने ४६ व्या स्थानावरून पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. याबद्दल महाराष्ट्र शासनाने पंचायत समितीला ‘आवास योजना’ पुरस्कार जाहीर केला होता. बीडीओ संदीप वायाळ यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या हस्ते नुकताच हा पुरस्कार स्वीकारला.
घरकुलांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अमळनेर पंचायत समितीला जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ बी.एन.पाटील, डीआरडीएचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन मेहनत घेतली. घनश्याम ठाकरे, स्वप्निल पाटील आणि रामकृष्ण पाटील, किशोर ठाकरे व कैलास भिल यांनी प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी मेहनत घेतली. पंचायत समितीतील बैसाणे, चंद्रकांत देसले, जितू पवार यांनी देखील सहकार्य केले. तत्कालीन बीडीओ अजय नष्टे, माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांचेही मार्गदर्शन लाभले होते.














