चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यात पूर व अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह घरे व पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले असतांना दुसरीकडे मात्र या अती पावसामूळे जलप्रकल्पांमध्ये अाबादाणी झाली अाहे. सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेल्या तालुक्यातील जल प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा झाल्याने भविष्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. निम्मे जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या गिरणा धरणात वरच्या भागातील धरणातून पाण्याचा ११ हजार ९१८ क्युसेक विसर्ग सुरू असल्याने िगरणा धरणातील जलसाठा मंगळवार अखेर ५७ टक्यांवर पोहचला आहे. तर तालुक्यातील मन्याडसह १४ लघू प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.
गिरणा धरणाने गतवर्षी सलग दुसऱ्यांदा शंभरी गाठली होती. यंदा मात्र पावसाच्या अनियमिततेमुळे गिरणेच्या जलसाठ्या संथगतीने वाढ हाेत आहे. २१ हजार ५०० दलघफू क्षमता असलेल्या या धरणात सध्या १३ हजार ७२७ दलघफू इतका जलसाठा अाहे. त्यापैकी ३ हजार दलघफू मृत साठा वगळता १० हजार ७२७ दलघफू जीवंत साठा आहे. गिरणाच्या उगम भागात नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे ५ प्रकल्प ओव्हर-फ्लो झाल्याने त्यातील पाणी गिरणात येत असल्याने धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत आहे. सध्यस्थितीतून ठेंगोडा बंधाऱ्यातून ६९०० क्युसेक, नागासाकीतून २१२ क्युसेक, चणकापूर २००६ क्युसेक, हरणबारी २ हजार क्युसेक व केळझर धरणातून ८०० असा ११ हजार ९१८ क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे.
चाळीसगाव तालुक्यातील प्रकल्पांमधील जलसाठा
गिरणा- ५७ %,मन्याड- १०० %, खडकीसीम- १००%, हातगाव -१००%, पिंप्री उंबरहोळ – १०० %, वाघला १- १०० %, ब्राम्हणशेवगे – १०० %, पिंपरखेड – १०० %, कुंझर २ – १०० %, वाघला २ – १००%, बोरखेडा – ५%, वलठाण – १००%, राजदेहरे – १००%, देवळी भोरस- ५५%, पथराड – १०० %, कृष्णापुरी – १०० %, कोदगाव – १०० टक्के.