मुंबई- आयएनएस खांदेरी’ ही अत्याधुनिक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात शनिवारी समाविष्ट करण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ’आयएनएस खांदेरी’ आणि ’आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांच्या जलावतरणाचा कार्यक्रम पार पडला.
संरक्षणमंत्रिपद स्वीकारल्यानंतर राजनाथ सिंह यांनी देशातील सर्व महत्त्वाच्या तळांना भेटी दिल्या. पण, पश्चिम नौदल कमांडची भेट ’आयएनएस खांदेरी’ ही पाणबुडी तयार नसल्याने रखडली होती. नौदल गोदीतील कार्यक्रमात ’खांदेरी’ नौदलाकडे सूपूर्द करण्याचा कार्यक्रम सकाळी साडेसात वाजता होईल.
या कार्यक्रमानंतर राजनाथ सिंह हे माझगाव डॉकला जातील. तेथे सावित्री सिंह यांच्या हस्ते ’आयएनएस निलगिरी’चे जलावतरण होईल. ही सातपुडा श्रेणीतील ’स्टेल्थ’ (रडारमध्ये टिपली न जाणारी) फ्रिगेट आहे. त्यानंतर राजनाथ सिंह पुन्हा नौदल गोदीत येतील. तेथे देशातील सर्वात मोठ्या नौका दुरुस्ती तळाचे (ड्राय डॉक) उद्घाटन ते करतील. हा 281 मीटर लांब, 45 मीटर रुंद व 16 मीटर खोली असलेला ड्राय डॉक समुद्रात उभारण्यात आला आहे. ’आयएनएस विक्रमादित्य’ ही विमानवाहू नौकाही तेथे दुरुस्त होऊ शकते.
नौदलप्रमुख अॅडमिरल करमवीर सिंग, पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस अडमिरल पी. अजित कुमार, माझगाव डॉक लिमिटेडचे अध्यक्ष कमोडोर (निवृत्त) राकेश आनंद हेही या कार्यक्रमात उपस्थित असतील.
सुरक्षेचा ’नारिंगी’ बावटा
संरक्षणमंत्र्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबई किनारपट्टीवर सुरक्षेचा ’नारिंगी’ बावटा लावण्यात आला आहे. यामुळे अरबी समुद्रातून मुंबईकडे येणारी जहाजे व बोटींच्या हालचालींवर दुपारपर्यंत निर्बंध असतील. प्रत्येक जहाजावर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाईल.