मुंबई – विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता आणि मला पक्षानं किमान निवडणूक प्रचारात सहभागी करून घेतलं असतं तरी आजचं महाराष्ट्राचं चित्र वेगळं दिसलं असतं. त्यासाठी आम्ही पक्षाला दोष देणार नाही. पक्ष कधीही चुकत नसतो. पक्षासाठी निर्णय घेणारे नेते चुका करतात,’ अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे.
निवडणूक निकालानंतर तब्बल महिनाभर रंगलेल्या राजकीय नाट्याचा काल शेवट झाला. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
अचानक फिरलेल्या या राजकारणावर भाष्य करताना खडसे यांनी स्वपक्षाच्या नेत्यांवर नाव न घेता निशाणा साधला. ‘अनेक वर्षे मी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या. दगडधोंडे, शेणाचा मारा सहन केला. मात्र, मला हेतूपरस्पर बाजूला ठेवलं गेलं. तिकीट दिलं गेलं नाही. तो निर्णय आम्ही मान्य केला. मात्र, पक्षाच्या प्रचारातही आम्हाला स्थान दिलं गेलं नाही. ती जबाबदारी आमच्यावर सोपवली गेली असती तर भाजपचे किमान २० ते २५ आमदार जास्त निवडून आले असते. मात्र, पक्ष वाढवणाऱ्यांनाचा बाजूला ठेवले गेले. त्याचा परिणाम निकालावर झाल्याचं स्पष्ट दिसतं,’ अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.