मुंबईः पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी शुक्रवारी सक्तवसुली संचालनालय (ईडी) च्या कार्यालयात जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ईडीच्या परिसरात कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये, असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरवरून समर्थकांना केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या चेअरमनसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यात शरद पवार यांच्या नावाचाही समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्याचे वृत्त टीव्ही माध्यमात आल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याशी तसेच बँकेशी आपला काही एक संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर मी स्वतः ईडीच्या कार्यालयात २७ सप्टेंबरला हजर होऊन चौकशीला सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते. बुधवारी शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यांत माझंही नाव आहे. माझ्या आयुष्यातील हे दुसरं प्रकरण आहे. ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे हे संध्याकाळी मला कळलं. त्यांच्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करणार आहे, असं पवार यांनी यावेळी सांगितलं होतं. पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे
ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचे ट्विट आज शरद पवार यांनी केले. शरद पवार यांनी एकूण तीन ट्विट केले आहेत. काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे, असे म्हटले. तर या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच तेथे शांतता राखली जावी याची काळजी घ्यायला हवी. वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पोलीस प्रशासन व सर्व सरकारी यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी ट्विटरवरून कार्यकर्त्यांना केले आहे.