गुवाहाटी / नवी दिल्ली – राज्यसभेत बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर चर्चा होत असताना त्याचे तीव्र पडसाद ईशान्य भारतात उमटले. आसाम, मणीपूर, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयमध्ये जोरदार निदर्शने सुरू आहेत. आसाममध्ये हजारो विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या दिशेने मार्च काढला. तर डिब्रूगडमध्ये निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ठिक-ठिकाणी लष्कर तैनात करण्यात आले आहे. त्रिपुरामध्ये सुद्धा संतप्त जमाव रस्त्यांवर उतरला. येथे राज्य सरकारने इंटरनेट पुरवठा बंद केला आहे.
नॉर्थ ईस्ट स्टूडंट ऑर्गनायझेशन (नेसो) च्या नेतृवत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाला 30 संघटनांचा पाठिंबा आहे. ईशान्य भारतात सुधारित नागरिकत्व विधेयक लागू झाल्यास येथील भाषा, संस्कृती आणि ओळख धोक्यात येईल अशी भीती येथील नागरिक व्यक्त करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा कायदा ईशान्य भारताच्या सुरक्षेसाठीच लागू केला जात असल्याचा दावा राज्यसभेत केला. परंतु, ईशान्य भारतातील स्थानिकांच्या मनातील शंका अजुनही दूर झालेल्या नाहीत.















