मुंबई – महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार विराजमान होऊन आठवडा झाला तरी अद्याप नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप होऊ शकलेले नाही. यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रस्सीखेच हेच कारण असल्याची माहिती एका मंत्र्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर दिली असून दोन्ही पक्ष महत्त्वाच्या खात्यांवर अडून बसल्याने कोंडी निर्माण झाली आहे, असे हा मंत्री म्हणाला.
शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत तर शिवसेनेकडून गटनेते एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, शपथविधीला आठ दिवस झाले तरी हे सर्व मंत्री आजही बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळेच खातेवाटप नेमकं का रखडलंय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद हेच कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत एका मंत्र्याने महत्त्वाची माहिती दिली.
लवकरात लवकर खातेवाटप व्हावं ही आमची अपेक्षा आहे. मात्र, काही महत्त्वाच्या खात्यांवरून रस्सीखेच सुरू असल्याने खातेवाटपास उशीर होत आहे. आधीच सत्तासंघर्षामुळे राज्यात सुमारे एक महिना सरकार अस्तित्वात नसल्याने प्रशासनावर परिणाम झाला असताना खातेवाटप आणखी रखडू नये अशी आमची अपेक्षा असल्याचे मत या मंत्र्याने बोलून दाखवले.