तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बॉम्ब’ प्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर होतं असलेल्या आरोप व राजीनाम्यावर बोलतांना माजी प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठं विधान केलं असून ते म्हणाले की,’कोणत्या अधिकाऱ्याने पत्र लिहिले म्हणून मंत्र्याने ‘राजीनामा’ द्यावा असं झालं तर ते चुकीचं असेल’
बाळासाहेब थोरात पुढे म्हणतात की,परमबीर सिंह यांनी बदली झाल्यावर पत्र लिहिले त्यामुळे त्यांच्या हेतूवर ‘शंका’ निर्माण होत आहे. पत्र लिहिण्यासाठी त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? हे ही स्पष्ट झाले पाहिजे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना कालच असं स्पष्ट केलं आहे.आता काँग्रेस देखील अनिल देशमुख यांच्या पाठीशी उभी असल्याचं चित्र दिसून येत आहे.
तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बॉम्ब’ प्रकरणावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपने जोरदार हल्ला चढवत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे जो पर्यंत गृहमंत्र्यांचा राजीनामा होत नाही तो पर्यंत भाजप मागे हटणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या या विधानाने स्पष्ट होतं की राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेस देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे.















