जळगाव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव युवक महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
जळगाव शहर विधानसभेची जागेवर राष्ट्रवादी पक्षाने दावा केला असला तरी अद्याप राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाकडून जागा वाटपाची निश्चिती झालेली नाही. अभिषेक पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाने संधी दिल्यास ते विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता जळगाव शहरची जागा राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला आली नाही किंवा अभिषेक पाटील यांना पक्षाने संधी नाही दिली तरी देखील अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे समजते. अभिषेक पाटील हे गेल्या दोन वर्षांपासून जळगाव शहर मतदार संघातून जोरदार तयारी करीत आहेत. त्यांनी तसा जनसंपर्क देखील सुरु केला आहे. अभिषेक पाटील यांनी बंडखोरी करत जळगाव विधानसभा निवडणूक लढविल्यास शहरातील मराठा समाजाचे प्राबल्य पाहता लढत जोरदार होईल असे मानले जात आहे.