जळगाव,(प्रतिनिधी)- पाचोरा तालुका वनपरिक्षेत्रातील पिंपरखेड शिवारातील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर आदिवासींनी बेसावधपणे हल्ला करत जखमी केल्याची घटना काल दि.२७ रोजी घडली.

याबाबत सविस्तर असे की, पाचोरा वनपरिक्षेत्रातील भडगाव तालुक्यातील पिंपरखेड शिवारातील राखीव वन ३६७ या जागेतील अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई, गस्ती पथकाचे आरएफओ आर.जी. राणे हे कर्मचाऱ्यांसह गेले असता प्रभू मानसिंग भिल, संजय मानसिंग भिल, शंकर प्रभू भिल यांच्या सह १५ ते १६ जण जमीन तयार करून शेती तयार करत होते याबाबत आरएफओ श्री.देसाई यांनी अतिक्रमण करणाऱ्याना अतिक्रमण करू नका असे सांगितल्याने संशयित आरोपी यांनी गावात जाऊन आपल्या संबंधितांना एकत्र करून जमाव जमवून दगड, काठ्या, विळे, कुऱ्हाड व गोफनच्या साहाय्याने हल्ला चढवला यात आरएफओ ज्ञानेश्वर देसाई, वनरक्षक सुरेश काळे, राजे मोहम्मद खान पिंजारी, बी. सी. पाटील हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी संशयित आरोपी प्रभू मानसिंग भिल, संजय मानसिंग भिल, शंकर प्रभू भिल यांच्या सह १५ ते १६ जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, सामुदायिक हल्ला, मारहाण करणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.














