जळगाव,(प्रतिनिधी)- आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यातून पुढे आलेल्या सौ. सुचित्रा महाजन या प्रभाग क्रमांक १६ मधून एक प्रभावी, सक्षम व ताकदवान उमेदवार म्हणून नागरिकांच्या पसंतीस उतरल्याची चर्चा सध्या राजकीय व सामाजिक वर्तुळात जोर धरू लागली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून कुटुंबव्यवस्था, महिलांचे सक्षमीकरण, दुर्बल घटकांचे पुनर्वसन व समुपदेशन या क्षेत्रात सक्रिय आहेत. बदलते नातेसंबंध, विवाहबाह्य संबंध, घटस्फोटाचे दुष्परिणाम आणि त्याचा मुलांवर होणारा परिणाम या संवेदनशील विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण समुपदेशन करत अनेक कुटुंबांना मानसिक आधार दिला आहे. केवळ समस्या ऐकून न घेता, योग्य निर्णय घेण्यासाठी कुटुंबांना बळ देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
विशेष म्हणजे समाजातील अत्यंत दुर्बल स्थितीत सापडलेल्या सुमारे २५ मुलींचे सुरक्षित पुनर्वसन करून त्यांना शिक्षण, समुपदेशन व स्वावलंबनाची दिशा देण्याचे धाडसी आणि मोलाचे कार्य त्यांनी केले. हे कार्य त्यांच्या संवेदनशीलतेसोबतच नेतृत्वगुणांचे ठळक उदाहरण मानले जात आहे.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले त्यांचे कार्यालय हे नागरिकांसाठी विश्वासाचे केंद्र बनले आहे. आरोग्य शिबिरे, नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण, महिलांच्या समस्या, कौटुंबिक व सामाजिक प्रश्न तसेच सामाजिक सुरक्षिततेशी संबंधित विषयांवर त्या नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत.
यापूर्वी त्यांनी महापालिका निवडणूक लढवली असून त्या निवडणुकीत त्यांनी अत्यंत सक्षम व ठाम अशी “टफ फाईट” दिली होती. त्या वेळी त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांचा निवडणूक अनुभव, जनसंपर्क, संघटन कौशल्य व संघर्षाची तयारी याबाबत कोणतीही शंका उरत नाही.
आता जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी अधिकृत मुलाखतही दिलेली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव, नागरिकांशी असलेली थेट नाळ आणि स्पष्ट भूमिका पाहता त्या पक्षासाठी व प्रभागासाठी एक मजबूत दावेदार म्हणून पाहिल्या जात आहेत.
सध्या प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांमध्ये सौ. सुचित्रा महाजन यांना मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, “काम करणारे, सहज उपलब्ध आणि विश्वासार्ह नेतृत्व” अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत त्या प्रभाग क्रमांक १६ मधून मतदारांची पसंती ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
सामाजिक कार्यातून आलेले नेतृत्व, अनुभवातून आलेली समज आणि विकास घडवण्याची ठाम इच्छा यामुळे सौ. सुचित्रा महाजन या जळगाव महानगरपालिका निवडणुकीत एक निर्णायक व प्रभावी नेतृत्व म्हणून उदयास येतील, असा विश्वास नागरिक व राजकीय कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.














