जामनेर,(प्रतिनिधी)-जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मोयगाव आणि पिंपळगाव गोलाई यांच्या मधोमध वसलेली ‘आई भवानी देवराई’ पर्यावरण संवर्धनाचे जिवंत उदाहरण बनली आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी येथील नागरिकांनी एक अनोखी परंपरा जपत ‘रक्षाबंधन ते वृक्षाबंधन’ हा उपक्रम साजरा केला.

मित्रपरिवाराच्या सहकार्यातून आई भवानी देवराई मध्ये “रक्षाबंधन व वृक्षाबंधन” असा अनोखा उत्सव साजरा
या उपक्रमात स्थानिक महिला, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला. या वृक्षा बंधनाच्याप्रसंगी सौ.सुनदाताई पाटील , डॉ.स्नेहा राजपूत,सौ.मायाताई पाटील,कु.पूजा पाटील,कु.देवयानी सिसोदिया,कु.गौरी कवळे या भगिनींसह वृक्ष मित्रमंडळी मधील जीवनसिंग पाटील, पृथ्वीराज पाटील, गजानन कछवाह, सोपान कवळे , स्वराज सिसोदिया इत्यादी मंडळी उपस्थित होती. भावंडांच्या नात्याबरोबरच निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव साजरा करत देवराईतील वृक्षांना राखी बांधण्यात आली. या वेळी प्रत्येक सहभागीने वृक्षांचे रक्षण आणि संवर्धन करण्याची शपथ घेतली.
या प्रसंगी इतिहास अभ्यासक डॉ. विश्वजीत सिसोदिया यांनी सांगितले की, “आई भवानी देवराईत आतापर्यंत तीन हजारांहून अधिक वृक्ष लावण्यात आले असून, त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही देवराई केवळ श्रद्धेचे नव्हे तर पर्यावरणाचेही रक्षण करते.” याप्रसंगी जीवनसिंग पाटील, गजानन कछवाह,सौ.सुनंदाताई पाटील व कु.पूजा यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले.
या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश थेट जनतेपर्यंत पोहोचला आहे. धार्मिक परंपरा आणि निसर्गसंवर्धन यांचा सुंदर संगम पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.