पाल, ता. रावेर : “शिक्षण हेच खऱ्या अर्थाने समाजाला उंच नेणारं पंख आहे आणि त्या पंखांना बळ देणं हेच आमचं ध्येय आहे” — अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी विद्यार्थ्यांप्रती आपली भावना व्यक्त केली.
आज जळगाव जिल्ह्यातील दुर्गम भागातील पाल येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. यात दप्तर, वह्या, पेनसह विविध शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले. उपस्थित पत्रकारांच्या पाल्यांनाही ही भेट देऊन त्यांच्यातही आनंदाची लहर निर्माण करण्यात आली. या उपक्रमासाठी जैन उद्योग समूह, जळगाव रामलालजी चौबे मेमोरियल ट्रस्ट, जळगाव याचे विशेष सहकार्य लाभले.

प्रविण सपकाळे म्हणाले, “शैक्षणिक साहित्याची भेट ही केवळ वस्तूंची देणगी नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे, त्यांच्या जिद्दीला दिशा देण्याचे काम करते. विद्यार्थी हेच देशाचे खरे भविष्य आहेत. दुर्गम भागात येऊन त्यांच्या डोळ्यांतील चमक पाहणे, त्यांच्याशी संवाद साधणे हा अमूल्य अनुभव आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात जर मदतीची आवश्यकता भासली, तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अधिक जोमाने विद्यार्थ्यांसाठी पुढे येईल.”

ते पुढे म्हणाले, “गेल्या आठ वर्षांपासून आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहोत. समाजात खऱ्या अर्थाने क्रांती घडवायची असेल, तर तिचा मार्ग शिक्षणातूनच जातो. शिक्षणच विचार बदलतं, स्वप्नं साकार करतं आणि समाजाला नव्या उंचीवर नेऊन पोहोचवतं असं ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्यध्यक्ष प्रविण सपकाळे तर विशेष अतिथी म्हणून धनंजय शिरीषदादा चौधरी, पत्रकार संघांचे खान्देश विभाग अध्यक्ष नगराज पाटील, कार्यध्यक्ष संतोष नवले, जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, खान्देश उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष योगेश सैतवाल, उत्तर महाराष्ट्र विभागाचे पदाधिकारी भुवनेश दुसाने, रावेर तालुकाध्यक्ष रवी महाजन, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद कोंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक खान्देश विभाग संघटक सुरेश पवार यांनी केले. जिल्ह्यातील विविध भागातील पत्रकार, स्थानिक मान्यवर, पालक आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उत्साहाने उपस्थित होते. साहित्य हातात घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चमक आणि मनात प्रेरणा स्पष्ट जाणवत होती. पालकांनी या उपक्रमाबद्दल मनापासून कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खान्देश विभाग संघटक सुरेश पवार,गणेश भोई,खान्देश विभाग कार्याध्यक्ष संतोष नवले,ग्रामीण जिल्हाध्यक्ष योगेश सैतवाल, गोपाळ पाटील, मगन पवार, पूनमचंद जाधव, या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष दीपक श्रावगे, रावेर तालुकाध्यक्ष रवी महाजन, राजेश चौधरी, पुरुषोत्तम संघपाळ, प्रदीप कुलकर्णी, किशोर परदेशी, अझर खान, राहुल जैन,सद्दाम पिंजारी, पोलिस कॉन्स्टेबल जगदीश पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.