उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील मऊ चिरायल गावात मानवी नात्यांना काळिमा फासणारी थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. अवैध संबंध लपवण्यासाठी एका आईनं स्वतःच्या ६ वर्षीय लेकीची गळा दाबून हत्या केली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या अल्पवयीन प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
अवैध संबंधांचा भयानक शेवट
मिळालेल्या माहितीनुसार, पिंकी शर्मा असं आरोपी महिलेचं नाव आहे. तिचं १७ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. घटनेच्या दिवशी घरात इतर कोणी नसल्याने तिनं प्रियकराला घरी बोलावलं. त्यावेळी निष्पाप मुलीनं त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. या प्रकारावरून मुलीनं आईला जाब विचारला. तसेच “ही बाब वडिलांना सांगणार” असंही तिनं ठामपणे सांगितलं. याच भीतीपोटी पिंकी आणि तिच्या प्रियकराने मुलीला पकडून गळा दाबून ठार केलं.
मृतदेह विहिरीत फेकून दिला
हत्या झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने दोघांनी मुलीचा मृतदेह पोत्यात भरला आणि रात्रीच्या वेळी घराजवळील विहिरीत फेकून दिला. मुलगी बेपत्ता झाल्याचं लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. चौकशीत आरोपींचा भांडाफोड झाला आणि मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपी आई आणि तिच्या अल्पवयीन प्रियकराला अटक केली आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून या घटनेनं संपूर्ण हाथरस जिल्हा हादरून गेला आहे.