जळगाव | प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने दिनांक 19 डिसेंबर 2025 पासून पुकारलेले राज्यव्यापी कामबंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागातील दीर्घकालीन प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्यांबाबत मा. मंत्री महसूल यांनी सकारात्मक भूमिका घेत ठोस आश्वासने दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश नन्नावरे यांनी दिली.

महसूल महासंघाने दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी शासनास कामबंद आंदोलनाची नोटीस दिली होती. त्यानंतर दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी मा. मंत्री महसूल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाच्या प्रतिनिधींशी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महसूल विभागाशी संबंधित विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीदरम्यान मा. मंत्री महसूल यांनी मावळ (जि. पुणे) येथील प्रकरणात निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन तीन दिवसांत मागे घेण्याचे, तसेच पालघर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच गौण खनिज प्रकरणात रात्री-अपरात्री घटनास्थळी जाण्याची गरज भासू नये यासाठी नवीन तांत्रिक प्रणाली विकसित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
नायब तहसीलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकारी यांच्या वेतनश्रेणी वाढीबाबत विशेष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याचे, तसेच आंदोलन काळातील वेतन तात्काळ अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महसूल विभागातील सर्व संवर्ग कार्यालयांचे सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी 19 डिसेंबर 2025 रोजी संघटनेच्या प्रतिनिधींशी स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच पोलीस विभागाच्या धर्तीवर नायब तहसीलदार पदासाठी स्वतंत्र विभागांतर्गत परीक्षा घेण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे.
अर्धन्यायिक प्रकरणांबाबत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये पोलीस हस्तक्षेपाबाबत मा. मंत्री महसूल यांनी मा. मुख्यमंत्री यांच्याशी तात्काळ चर्चा करण्याचे आश्वासन दिले. महसूल अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाखाली चुकीची कामे करू नयेत, तसेच दबाव टाकणाऱ्यांविरोधात थेट मंत्र्यांकडे तक्रार करावी, असे स्पष्ट आश्वासनही यावेळी देण्यात आले.
भारतीय दंड संहिता 2023 अन्वये महसूल अधिकाऱ्यांना कार्यकारी दंडाधिकारी घोषित करण्यासाठी गृह विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
मा. मंत्री महसूल यांनी घेतलेल्या तात्काळ निर्णयांमुळे व सकारात्मक भूमिकेमुळे महसूल महासंघाने संपूर्ण मागण्या पूर्ण होईपर्यंत कामबंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल महासंघातर्फे मा. मंत्री महसूल, मा. अपर मुख्य सचिव महसूल तसेच मंत्रालयातील महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.









