जळगाव | नजरकैद न्यूज : जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ६ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शाहू महाराज नगरातील तपस्वी हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली.
ढोल-ताशांच्या गजरात आणि महिलांच्या औक्षणाने स्वागत
पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एजाज मलीक यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात प्रचाराला सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी उमेदवारांनी छत्रपती शाहू महाराज नगर, हौसिंग सोसायटी, दत्त कॉलनी, इंदिरा नगर आणि खान्देश मील कॉलनी परिसरात झंझावाती पदयात्रा काढली. यावेळी परिसरात चैतन्याचे वातावरण दिसून आले. अनेक ठिकाणी गृहिणींनी उमेदवारांचे औक्षण करून आणि पेढा भरवून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.
प्रभाग ६ चे ‘तुतारी’चे शिलेदार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने प्रभाग ६ मधून पाटील हेतल महेंद्र (प्रभाग ६ अ), प्रेरणा रामेश्वर मिश्रा (प्रभाग ६ ब), तनवीर अब्दुल राशिद शेख (प्रभाग ६ क), किरण लक्ष्मण राजपूत (प्रभाग ६ ड) या उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे.
मतदारांना केले आवाहन
उमेदवारांनी “तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटण दाबून विकासाला साथ द्या,” असे आवाहन मतदारांना केले आहे.
मतदान १५ जानेवारीला
जळगाव महानगरपालिकेसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. प्रभागातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाचे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मैदानात उतरल्याने प्रभाग ६ मध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.














