जळगाव, नजरकैद न्यूज – महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह रविवारी पिंप्राळा भागातील भवानी माता मंदिर परिसरातून करण्यात आला आहे.यावेळी महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत होते.

याप्रसंगी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, जळगावात चांगला प्रतिसाद पाहता महायुती जोरदार निवडून येणार, यामध्ये मला काही शंका नाही. २०४७ ला एक विकसित भारत म्हणून आपल्याला पाऊल उचलायचे आहे. त्यासाठी महायुतीचे नेते जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आपली साथ हवी आहे, अशी साद भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. यावेळी विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. चव्हाण यांनी सर्वांना भगवा गमछा देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी महायुतीच्या सर्व उमेदवारांनी प्रदेशाध्यक्षांचा सत्कार करून विजयाची शपथ घेतली.
.. तसे महापालिकेतही महायुतीचे ‘तिसरे इंजिन’ ; आ. राजूमामा भोळे:
जळगावच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी केंद्रात आणि राज्यात जसे ‘डबल इंजिन’ सरकार आहे, तसे महापालिकेत महायुतीचे ‘तिसरे इंजिन’ जनतेने जोडावे, असे आवाहन आमदार भोळे यांनी केले.
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन:
आपल्या आक्रमक शैलीत बोलताना गिरीश महाजन यांनी विरोधकांना इशारा दिला. “जळगावात महायुतीची लाट असून, आम्ही सर्व ७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या भव्य सभेमुळे जळगाव शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून, महायुतीने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांसह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पिंप्राळा बाजार मैदानात आयोजित केलेल्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांची अलोट गर्दी उसळली होती, ज्यामुळे परिसरात महायुतीचे मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले.
दरम्यान, प्रसंगी काही उमेदवारांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रसंचालनातून विशाल त्रिपाठी यांनी दिली. यामध्ये १३ ब मध्ये सुरेखा तायडे यांना अपक्ष व भाजप कार्यकर्ते प्रिया विनोद तायडे, १० ड मध्ये जाकीर खान पठाण यांना शेख अहमद नूर, अपक्ष, १० क मध्ये कविता शिवदे यांना अपक्ष नीलूताई संजय इंगळे यांनी, ८ क मध्ये भाजपा बंडखोर माजी नगरसेवक विजय पाटील यांनी अमर जैन यांना तर १६ क मध्ये रंजना वानखेडे यांना शिवसेनेचे कार्यकर्ते व अपक्ष उमेदवार मीनल हर्षल मावळे यांनी पाठिंबा दिला. तर ९ ड मध्ये डॉ. चंद्रशेखर पाटील यांना राज कोळी यांनी जाहीर पाठिंबा दिला.












