जळगाव दि. 1 प्रतिनिधी – मनातील संवेदनशीलता, सामाजिक भावनेतून अंतरंगातील प्रकाश आणि नैसर्गिकरित्या जिवनातील सावल्यांची अनुभूती चित्रातुन दिसते. जळगावमधील ही चित्रे चित्रकलेला नव दृष्टीकोन देऊन जातात. काळे गडद आकारात मनाला ओसाड प्रदेशात अबोल नकाशा दाखवितात. जिथे मनाचा गोंधळ न होता, नाविन्याचा शोध सुरु होतो. अंधारातुन प्रकाश दिसतो आणि अदृश्य नादाला माणूस होण्याची प्रक्रीया सुरू करुन देतात. प्रकाश शोधण्याची उमेद कधीच संपत नाही ती सावल्यांप्रमाणे चिरंतर सोबत असते. असा सुर ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनावेळी मान्यवरांचा उमटला.
जैन इरिगेशन चे संस्थापक पद्मश्री भवरलालजी जैन यांना समर्पित असलेल्या ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स कलादालनात दि.1 ते 15 डिसेंबर दरम्यान सर्वांसाठी खुले असेल. याचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, कवि अशोक कोतवाल, खिरोद्याचे प्राचार्य अतुल मालखेडे, मुंबईचे प्रा. राजेंद्र पाटील, चोपड्याचे राजु महाजन, पु. ना. गाडगीळचे व्यवस्थापक श्री. ढेरे यांच्यासह चित्रकार जैन इरिगेशनच्या कला विभागातील विकास मल्हारा, विजय जैन, शरद तायडे, शुचिता तायडे उपस्थित होते. त्यांच्यासह जैन इरिगेशनचे अनिल जोशी, सचिन मुसळे, निरंजन शेलार, हारूल पटेल, संतोष साळवे, मनिष पात्रीकर, तरुण भाटे, मनोज जंजाळकर, शाम कुमावत, सुभाष मराठे, आनंद पाटील, सरित सरकार, सुदिप्ता सरकार, सोनाली पाटील, निलमा जैन, बिना मल्हारा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चित्र साक्षरता यावर औपचारिक चर्चा घडविण्यात आली. याचे समन्वय ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. ‘ग्रॅव्हिटी’ गुरूत्वाकर्षण ही संकल्पना समजविताना काळानुसार निश्चित व अनिश्चितेच्या कसोट्यांवर आपल्याला रंग, आकार, रेषा शोधाव्या लागतात, त्यात इंद्रधनुष्य लोभास आहे की कसा याचेही चिंतन करावे लागते असे ज्ञानेश्वर शेंडे म्हणालेत. अशोक कोतवाल यांनी भारतीय चित्रकारांची महानता ही चित्रकारांच्या दृष्टीने काय आहे हे सांगत, चित्रामध्ये आपले प्रतिबिंब त्यातून दिसणे खऱ्या अर्थाने चित्र असल्याचे ते म्हणाले. पुणे येथील चित्रकार शरद तायडे यांनी जळगावातील चित्रकलेत आनंदाचे हावभाव दिसतात. जळगाच्या कलेत शुद्धता जाणवली. कलागुणांनी संपन्न झालेल्या या प्रदेशात चित्रातील नवीन दृष्टी अनुभवता आली. त्यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह परिवार प्रोत्साहन देत असल्याने ते विशेष भावल्याचे ते म्हणाले. मुंबईचे प्रा. राजेंद्र पाटील यांनी अमूर्त शैली मध्ये जळगाव सारख्या शहरात समकालीन चित्रकारांची आठवण करुन देतात. ही चित्र प्रत्येकाला प्रोत्साहन देऊन जातात. राजू महाजन यांनी अमूर्त शैलीतील चित्रे ही वेगळा विचार मांडणारी असून त्यात आठवणींचा प्रवास दिसतो. प्रकाश व सावल्यांचा आकार दिसतो. गाव दिसते तेथील व्यवस्था दिसते. रेषांसोबत रंग अंजिठ्याशी नाते सांगते. चित्रकलेत आपल्या अनुभवांचे प्रतिबिंब जेव्हा उमटते तेव्हा भावनांचा कल्लोळ न होता ती हृदयापर्यंत पोहचतात आणि चित्रकलेचा अवकाश मोठा होत जातो असे म्हटले. प्रदर्शनाचे संकल्पक ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी चित्रसाक्षरतेवर भाष्य केले. चित्रकारांकडे नितळ दृष्टीकोन असतो तो इतर कुठल्याही क्षेत्रातील कलावंतांकडे नसतो. ज्याला अरूपाचे रुप चित्रातून मांडता येते प्रत्येकाच्या मनाप्रमाणे आकार साकारता येतो. निर्गूणांचा शोध घेता येतो ती चित्र म्हणजे अमूर्त शैलीची चित्रे त्यात वारीतील बाह्य रूपसुद्धा दिसते विठोबाच्या पालखीची प्रतिकृती दिसते. कला बकाल होण्यापासून वाचविणारी व माणूस म्हणून जगण्याची शिकवण ही ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनातून मिळत असल्याचे शंभू पाटील म्हणाले. ज्ञानेश्वर शेंडे यांनी आभार मानले.











