नातेसंबंध, विश्वास आणि मैत्री विसरून मौजमजेच्या नादात काही जण कोणत्याही थराला जात असल्याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात पत्नींच्या अदलाबदल प्रकरणामुळे पोलिसही गोंधळले असून या घटनेची सुरुवात गुजरातच्या अहमदाबादमधून झाली आहे.
कशी झाली सुरुवात?
लक्ष्मणपूर गावातील अनुप यादव आणि पप्पू कोरी हे दोघे मित्र नोकरीसाठी अहमदाबादमध्ये राहत होते. दोघांनी स्वतंत्र भाड्याची घरे घेतली होती आणि पत्नीसह स्थायिक झाले होते. काही दिवसांपूर्वी अनुप यादवने पोलीस ठाण्यात तक्रार केली की, त्याची पत्नी हरवली असून मित्र पप्पूने तिला फसवून पळवून नेलं आहे.
पत्नीकडून वेगळीच तक्रार
अनुपची पत्नी मात्र थेट बाराबंकी जिल्ह्यात पोहोचली आणि तिने उलट अनुपविरुद्धच पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या म्हणण्यानुसार –
“लग्नाला दोन वर्षे झाली, पती सतत मारहाण करत होता. मला माहेरी सोडून गेला आणि परत आल्यावर मला जबरदस्तीने मित्र पप्पूसोबत राहण्याचा दबाव टाकू लागला. विरोध केल्यावर जीव मारण्याची धमकी दिली.”
पोलिसांचा गोंधळ
या तक्रारीनंतर दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीदरम्यान पप्पू कोरीने सांगितले की –
“मी घरी नसताना अनुप माझ्या घरी जात असे. त्याने माझ्या पत्नीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिला घेऊन गेला. बदल्यात स्वतःची पत्नी माझ्याकडे ठेवून गेला.”
परिस्थिती अशी झाली की कोण खोटं बोलतोय आणि कोण खरं, हेच पोलिसांना समजेनासं झालं. एका बाजूला अनुपची पत्नी चार महिन्यांपासून पप्पूसोबत राहत असल्याचं स्पष्ट झालं, तर दुसरीकडे पप्पूची पत्नी मात्र अनुपला साथ देत असल्याचं समोर आलं.
शेवटी पोलिसांचा तोडगा
चौघांमध्ये गुंता वाढत असल्यामुळे पोलिसांनी त्यांचं समुपदेशन केलं. सर्वांना इशारा देण्यात आला की, पुन्हा अशी तक्रार आल्यास कठोर कायदेशीर कारवाई होईल. अखेर चौघांनाही त्यांच्या त्यांच्या घरी पाठवण्यात आलं आहे.