परळी शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष कृत्याने पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. केवळ १२ वर्षांच्या बालिकेवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला असून या प्रकरणात आणखी दोन जणांनी आरोपींना मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. अवघ्या आठ दिवसांत घडलेली ही दुसरी गंभीर घटना असल्याने नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
नेमकी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घराजवळ असताना आरोपींनी तिला फसवून नेले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. या गुन्ह्यात आणखी दोन जणांनी आरोपींना साथ दिल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.
संभाजीनगर पोलीस ठाण्यात चारही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोन आरोपींवर अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा तर उर्वरित दोघांवर मदतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बरकत नगर परिसरातील एका आरोपीला अटक केली असून उर्वरितांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
परिसरात संताप
याआधी अवघ्या काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानक परिसरात केवळ चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. ती घटना नागरिक विसरले नसतानाच पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने परिसरात भीती व संतापाचे वातावरण आहे.
नागरिकांचा सवाल
बीड जिल्ह्यात सतत घडणाऱ्या हाणामारी, खून आणि अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारांवर कडक कारवाई करूनच अशा घटनांना आळा बसेल, अशी मागणी नागरिक करत आहेत.