भडगाव (गणेश रावळ): भडगाव शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणून तिचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये टिपून “हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन” अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणावर POCSO कायदा आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित तरुण दिनेश राजू माळी हा काही महिन्यांपूर्वी त्या मुलीच्या संपर्कात आला होता. सुरुवातीला त्याने प्रेमसंबंधाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. नकार दिल्यानंतर त्याने तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील फोटो काढले आणि ते प्रसारित करण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या पीडित मुलीने अखेर आपले सर्व सांगून पालकांकडे धाव घेतली. पालकांनी तत्काळ भडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार या करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे.










