जळगाव, नजरकैद न्यूज | प्रतिनिधी –
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जळगावच्या राजकीय रणांगणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या शिष्टाईला काही प्रमाणात यश आले असून अवघ्या दोन दिवसांत तब्बल ३१७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये ३०१ अपक्ष उमेदवारांसह उद्धवसेना, राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.

१०३८ अर्जांपासून सुरू झालेला हा निवडणूक प्रवास आता अंतिम ३२१ उमेदवारांवर येऊन थांबला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने लढतींचे स्पष्ट चित्र समोर आले असून, राजकीय समीकरणे अधिकच तापली आहेत.
६३ जागांवर थेट लढत, १२ जागांवर बिनविरोध चित्र
महानगरपालिकेच्या एकूण जागांपैकी ६३ जागांवर थेट निवडणूक लढत होणार आहे, तर १२ जागांवर आधीच बिनविरोध निवडीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या ६३ जागांवर प्रमुख पक्षांचे उमेदवार, अपक्ष आणि प्रस्थापित नेत्यांमध्ये प्रतिष्ठेची लढाई रंगणार आहे.
मनसे, प्रहारसह विविध पक्षांची माघार
माघारीच्या प्रक्रियेत मनसेचे अविनाश भास्कर पाटील (प्रभाग १६ अ) आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे योगेश संजय कदम (प्रभाग २ ड) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
राष्ट्रवादीतून पाच ठिकाणी माघार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून पाच उमेदवारांनी माघार घेतली आहे.
प्रभाग १३ ‘क’ – पारुबाई पांडुरंग पाटील
प्रभाग १५ ‘अ’ – अनंत प्रमोद जोशी
प्रभाग १५ ‘ब’ – ममता संदीप बाविस्कर
प्रभाग १९ ‘अ’ – सरला सुनील सोनवणे
प्रभाग १९ ‘ब’ – उज्ज्वल सुरेश पाटील
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून लता अंबादास मोरे (प्रभाग १० ‘ब’) यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
इतर पक्षांचे उमेदवारही मैदानाबाहेर
समाजवादी पार्टीच्या पिंजारी सईदाबी अहमद (प्रभाग ४ क) आणि शहा युसूफ शहा मेहबूब (प्रभाग २ ड) यांनी माघार घेतली.
स्वराज्य शक्ती सेनेचे केशव दिलीप पाटील (प्रभाग १९ ब) आणि सूर्यभान साहेबराव सपकाळे (प्रभाग १९ ड) यांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.
उद्धवसेनेच्या माघारीने राजकीय गणिते बदलली
माघारीच्या अखेरच्या दिवशी उद्धवसेनेने चार प्रभागांतून उमेदवार मागे घेतले.
प्रभाग ७ ‘अ’ – जयश्री भिकन हिवराळे
प्रभाग ७ ‘ब’ – सुमन वीरभान पाटील
प्रभाग ७ ‘क’ – सागर प्रकाश पाटील
प्रभाग १८ ‘अ’ – मयूर चंद्रशेखर सोनवणे
विशेषतः प्रभाग ७ मधील माघारीमुळे भाजपच्या उमेदवारांचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
राजकीय रणधुमाळी शिगेला
मोठ्या प्रमाणातील माघारीनंतर आता अंतिम ३२१ उमेदवारांमध्ये खरी लढत सुरू झाली आहे. पक्षीय बलाबल, स्थानिक समीकरणे आणि अपक्षांची भूमिका यामुळे येत्या काळात मनपा निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.












