जळगाव, नजरकैद न्यूज – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस–रिपाई महायुतीकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या बंडखोर उमेदवारांबाबत भारतीय जनता पक्षाने कडक भूमिका घेत इशारा दिला असून, महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रभाग क्र. १३ मध्ये महायुतीच्या कमळ, धनुष्यबाण व घड्याळ चिन्हांवरील उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाकडून १३ अ गटातून नितीन प्रभाकर सपके, १३ ब गटातून सौ. सुरेखा नितीन तायडे हे अधिकृत उमेदवार असून १३ क गटातून सौ. वैशाली अमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १३ ड गटातून प्रफुल्ल गुलाबराव देवकर हे अधिकृत उमेदवार आहेत.
दरम्यान, भाजपकडून इच्छुक असलेल्या काही उमेदवारांनी पक्षाच्या स्पष्ट सूचनांनंतरही आपली उमेदवारी मागे न घेता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे उमेदवार स्वतःला भाजपचेच उमेदवार असल्याप्रमाणे प्रचार करत असल्याचे निदर्शनास येत असून, त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपने स्पष्ट केले आहे की, महायुतीचे अधिकृत उमेदवार हे केवळ अ, ब आणि ड गटातील कमळ व घड्याळ चिन्हावरील उमेदवारच आहेत. तसेच जे बंडखोर उमेदवार येत्या दोन दिवसांत आपल्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट करणार नाहीत, त्यांच्यावर पक्षातर्फे योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा थेट इशाराही देण्यात आला आहे.
प्रभाग क्र. १३ मधील सर्व मतदार बंधू-भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन भाजप–महायुतीकडून करण्यात आले आहे.












