जळगाव, दि. ८ ऑगस्ट (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील तब्बल ९६ ठिकाणी गोवर्गीय जनावरांमध्ये लंम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease – LSD) या विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा रोग अतिशय संसर्गजन्य असल्याने जिल्ह्यातील निरोगी पशुधनास मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी तातडीने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

संपूर्ण जिल्ह्यात बाजारपेठा, शर्यती, वाहतूक बंदी
▪ गोवर्गीय जनावरांची खरेदी-विक्री बंद :
जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय जनावरांचे बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र म्हैसवर्ग, शेळी व मेंढ्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्याने त्यांचे बाजार सुरु राहतील.
▪ जनावरांच्या शर्यती, जत्रा, प्रदर्शन बंद :
गोवर्गीय जनावरांची शर्यत, प्रदर्शने व जत्रा या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
▪ वाहतूक नियंत्रण :
जिल्ह्यात गोवर्गीय जनावरांची आंतरराज्य, आंतरजिल्हा आणि आंतरतालुका वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली असून, केवळ LSD प्रतिबंधक लसीकरण करून २८ दिवस पूर्ण झालेल्या जनावरांना प्रमाणपत्रासह वाहतुकीस परवानगी दिली जाईल.
सार्वजनिक चराई व पाणी व्यवस्था तात्पुरती थांबविण्याचे निर्देश
सार्वजनिक चराई क्षेत्रे आणि जनावरांसाठी असलेले सार्वजनिक पाणी हौद पुढील १५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यामुळे रोगाचा प्रसार थांबवण्यास मदत होईल. लंम्पी स्किन डिसीजचा प्रसार डास, माशा, गोचिड यांसारख्या बाह्य परोपजीवी कीटकांमुळे होतो. त्यामुळे आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यांमध्ये कीटकनाशक फवारणी करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे.
▪ मृत जनावरांवर शास्त्रशुद्ध विल्हेवाट आवश्यक
LSD मुळे मृत झालेल्या जनावरांना योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ६x८ फुटांचे खड्डे तयार करण्यात यावेत. ही जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली असून आवश्यक असल्यास गटविकास अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने काम करण्यात येणार आहे.
सर्व खाजगी पशुवैद्यकांनी LSD संदर्भातील माहिती शासकीय संस्थांना देणे बंधनकारक आहे. परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय पशुवैद्यकीय संस्थांनी आवश्यक औषधे वरिष्ठांशी चर्चा करून उपलब्ध करून घ्यावीत, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
https://x.com/InfoJalgaon/status/1953774134292320766?t=Ou088aSelaONU0VsCgNgYg&s=19