जळगाव,(प्रतिनिधी): जळगाव येथे झालेला समृद्ध खान्देश निर्धार मेळावा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या मेळाव्यात लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभाताई शिंदे यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशानंतर अजितदादा पवारांनी प्रतिभाताई व त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत केलं व सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी भाषण करताना स्पष्ट केलं की, “युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जाती-धर्मात भेदभाव केला नाही. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन रयतेचं राज्य प्रस्थापित केलं. त्याच विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेस वाटचाल करत असून, सर्व जाती-धर्मांना न्याय मिळवून देणं आणि सलोखा राखणं हेच आमचं प्रमुख ध्येय आहे.”
अजितदादांनी पुढे सांगितलं की आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, शेतकरी व बेरोजगार युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष व सरकार कटिबद्ध आहेत. प्रतिभाताई शिंदे यांनी गोरगरिबांच्या न्यायासाठी, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी अनेक वर्षे संघर्ष केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे जळगाव, धुळे, नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्र व गुजरातमधील काही भागात पक्षाला निश्चितच नवं बळ मिळणार आहे.
शेवटी अजितदादांनी अधोरेखित केलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष असून, राज्यात आयटी हब, एमआयडीसी, युवकांना रोजगार संधी, विमानतळ व औद्योगिक विकासासाठी महायुती सरकार काम करत आहे.