जळगाव : येथील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज परिसरात सुरू असलेल्या ॲग्रोवर्ल्डतर्फे आयोजित कृषी प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारो शेतकरी सकाळपासूनच प्रदर्शनस्थळी दाखल होत दिवसभर विक्रमी गर्दी पाहायला मिळाली. आधुनिक शेतीत उपयोगी पडणारी नवीन यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीविषयक मार्गदर्शन आणि शाश्वत शेतीच्या पद्धती पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्साह दाखवला. प्रदर्शनाचा सोमवारी (ता. 24) समारोप आहे.
जळगाव जिल्हा हा देशात सर्वाधिक केळी लागवड असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. जळगावच्या केळीचा दर्जा जागतिक पातळीवरही स्पर्धात्मक आहे. तरीदेखील राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जळगावची केळी निर्यात मात्र तुलनेने कमी असल्याकडे लक्ष वेधत अपेडाचे डेप्युटी जनरल मॅनेजर प्रशांत वाघमारे यांनी जळगाव जिल्ह्याला केळी निर्यातीचे ‘हब’ बनण्याची मोठी क्षमता असल्याचे सांगितले. ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात शनिवारी जळगाव जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, ॲग्रीसर्च इंडियाचे संचालक तन्मय कोठावदे, मेट्रोजेन बायोटेक प्रा. लिचे संचालक प्रियंक शहा, डोम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, नमो बायो प्लाटचे पार्श्व साबद्रा, जिल्हा विकास संसाधनचे समाधान पाटील, जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी डी जडे, ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. वाघमारे म्हणाले, की उत्पादनाच्या गुणवत्तेबरोबर प्रक्रियाकरण, शीतसाखळी व्यवस्था, निवड-ग्रेडिंग केंद्रे आणि निर्याताभिमुख पॅकेजिंग प्रणाली मजबूत केली तर जळगावची केळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यात आघाडीचे स्थान मिळवू शकते. त्यासाठी अपेडातर्फे सर्वोतोपरीने मदत केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कुरबान तडवी यांनी ॲग्रोवर्ल्ड प्रदर्शन दरवर्षी शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शेतीतील तंत्रज्ञान उपलब्ध करून देते.
किचन गार्डन ते मका हार्वेस्टर यंत्र मुख्य आकर्षण
कृषी यंत्र व अवजारांच्या ४५ स्टॉलसह प्रदर्शनात २१० हून अधिक स्टॉल्स आहेत. सध्या मजूरटंचाईमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी येथे प्रदर्शित मका हार्वेस्टर हे यंत्र वरदान ठरणार आहे. मका हार्वेस्टर मशीन एका दिवसात ८-१० एकर मका हार्वेस्ट करते. प्रदर्शनात लागवडीपासून काढणीपर्यंतचे श्रम कमी करणाऱ्या या यंत्राचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. यासोबतच बी लागवड, फवारणी, नांगरणी, तणनाशन, काढणीपर्यंतची विविध यंत्रे शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून विविध कंपन्यांनी प्रदर्शनात मांडली आहेत. भर पावसाळ्यात शेतात काम करणे अवघड असते. त्यासाठी आवश्यक असलेले हाय व्हील्सचे स्पेशल चाके येथे उपलब्ध असून त्याद्वारे फवारणी, पिक काढणी करू शकतो. वाफसा नसलेल्या शेतात देखील हे उपकरण उपयुक्त ठरणार असल्याने शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनात किचन गार्डन टूल्सची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देण्यात आली असून शहरातील घरगुती बागकाम करणाऱ्या नागरिकांसाठी ही साधने मोठी सोय ठरत आहेत. स्वत:च्या घरच्या अंगणात किंवा टेरेसवर बाग उभी करण्यासाठी लागणारी हातसाधने, कटर, स्प्रे पंप यांसारख्या साहित्यामुळे घरगुती बागकाम अधिक सुलभ होणार आहे.
..जंगली प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करणारे झटका मशिन…
ग्रामीण भागात वाढत्या जंगली प्राण्यांच्या त्रासामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी झटका मशिन हा पर्याय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असून प्रदर्शनात या स्टॉलला विशेष गर्दी दिसून आली. सुरक्षित आणि नियंत्रित विजेच्या प्रवाहावर आधारित ही तंत्रसामुग्री शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. इफ्कोतर्फे ड्रोन फवारणाची प्रत्याक्षिक करण्यात आले.
आता शेताचाही ‘आरओ’
सतत बागायती पिके घेतल्यामुळे जमिनीचा पीएच स्तर वाढून जमीन क्षारयुक्त होत आहे. परिणामी जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता घटत चालली आहे. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून यंदाच्या कृषी प्रदर्शनात ‘शेतासाठी आरओ प्रणाली’ शेतकऱ्यांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरली आहे. पिण्यासाठी जसे आरओ फिल्टर वापरले जाते, तशीच तंत्रज्ञानावर आधारित ही मृदुद्धार प्रणाली जमिनीतून अतिरिक्त क्षार काढून टाकण्यास मदत करते. या प्रक्रियेमुळे मातीतील संतुलन सुधारते, पिकांच्या मुळांना पोषकतत्वे मिळण्याची क्षमता वाढते आणि उत्पादनात भरघोस वाढ होण्याची शक्यता निर्माण होते.
ॲग्रोवर्ल्ड पुरस्कार विजेते
ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी पुरस्कार : सागर पाटील (केकतनिंभोरा), नितीन अग्रवाल (आटवाडे), देवेंद्र पाटील (वडली), मोतीलाल पाटील (एकलग्न), सागर पाटील (शहापूर), किशोर व महेंद्र महाजन (उत्राण), विनोद बोरसे (पिचर्डे), मोहन शिंदे (पिंपरी खुर्द), संदीप पाटील (दोणदिगर), ॲग्रोवर्ल्ड कृषी ऋषी पुरस्कार : रविंद्र गुजर (पुनगाव), ॲग्रोवर्ल्ड कृषी उद्योजक द्रोणाचार्य पुरस्कार समाधान पाटील (जळगाव), ॲग्रोवर्ल्ड कृषी उद्योजक पुरस्कार : ऋषिकेश चव्हाण (कानळदा) व भास्कर माळी (जळगाव), ॲग्रोवर्ल्ड कृषी जोड व्यवसाय पुरस्कार : श्यामल जावरे (पूर्णाड), ॲग्रोवर्ल्ड आदर्श पुरुष गट शेती पुरस्कार : देवकीनंदन शेतकरी गट ( नांदगाव), रायगड शेतकरी गट (चिंचखेडा), श्रीराम शेतकरी गट (वावडे). शेतकरी राजा शेतकरी गट (मोयगाव बु.)











