जळगाव (विशेष प्रतिनिधी) – कोरणा सारख्या गंभीर महामारी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उपाय योजनेसाठी जळगाव पोलीस दलात पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत जमा करण्याचे विनंती पत्र पोलीस अधीक्षक जळगाव यांना दिले असल्याचे दैनिक नजरकैद शी बोलतांना सांगितले आहे.या मदतीने खाकीतील माणुसकीचे दर्शन जळगाव जिल्ह्याला पाहायला मिळाली आहे.
बोलताना पुढे पोलीस नाईक विनोद अहिरे म्हणाले की, आपण पोलिसांना फक्त कठोर मनाचे म्हणून बघत असतो पण सध्याच्या काळात शासन, प्रशासन, डॉक्टर, पोलिस पूर्णपणे आपल्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. आपणही सरकारच्या आदेशाचे पालन करून घरामध्येच थांबून सुरक्षित राहावे असे आवाहन विनोद अहिरे यांनी केले आहे.तसेच कोरोना प्रादुर्भावमुळे सर्वसामान्यांचे जीवन अतिशय विस्कळीत झाले आहे. मजूर व झोपडपट्टी वर्ग हा भुकेने तडफडत आहे.अशा या काळात प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्याची वेळ निसर्गाने मानवाला दिलेली आहे. म्हणून आपल्या परीने तन-मन-धनाने सरकारच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे.
त्यांनी आपल्या विनंती पत्रात म्हटले आहे की कोरणा या महामारी रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्यात आपला भारत देश देखील सुटलेला नाही.त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, हा विषाणू धर्म,पंथ गरीब-श्रीमंत असा भेदभाव जरी करीत नसला तरी त्याचा सर्वात जास्त फटका ज्यांची एक वेळची जेवणाची भ्रांत आहे, अशा गोरगरीब कष्टकरी जनतेला बसतो आहे. या संदर्भातल्या बातम्या बघून आम्ही प्रचंड व्यथित झालो आहे.या महामारीला रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकार व संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहे.मला हे देखील माहीत आहे की या उपाययोजनेसाठी माझी ही मदत अथांग समुद्रातील एक जलबिंदू आहे, परंतु थेंबाथेंबाने सागराची निर्मिती होत असते हे देखील तितकेच खरे आहे.म्हणून आमचे माहे मार्च 2020 चे वेतन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सहायता निधी COVID-19 बँकेचे बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडिया या खात्यात जमा करण्याची विनंती पोलीस अधीक्षक जळगाव यांना विनोद अहिरे यांनी पत्राद्वारे केली आहे.