जळगाव,(प्रतिनिधी)- दि. 30 सप्टेंबर : ज्ञानेश्वरभाऊ उत्तमसिंग मोरे यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी ज्ञानेश्वरभाऊ मोरे न्याय कृती समिती व सर्व समाजबांधवांच्या वतीने उद्या, गुरुवार दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी जळगाव शहरात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा सकाळी 10 वाजता महाराणा प्रतापसिंह स्मारक येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या माध्यमातून संबंधित हत्या प्रकरणाचा निष्पक्ष व जलद तपास करावा तसेच दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशा मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत.
समितीच्या निवेदनानुसार, 26 सप्टेंबर 2026 रोजी ज्ञानेश्वरभाऊ उत्तमसिंग मोरे यांच्या हत्येची घटना घडली. या घटनेनंतर मृतदेहाची अवहेलना झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्यांचा मुलगा यश याच्यावरही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शांततेच्या मार्गाने मोर्चा
आयोजकांनी मोर्चा शांततामय व लोकशाही मार्गाने काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करण्यात येईल, तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार असून, त्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनाद्वारे हत्या प्रकरणाचा निष्पक्ष व जलद तपास, पीडित कुटुंबाला न्याय आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात येणार आहे.
मोर्चासाठी ज्ञानेश्वरभाऊ मोरे न्याय कृती समिती तसेच सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.










