जळगाव, दि. १३ (प्रतिनिधी) — जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजप उमेदवार गायत्री इंद्रजित राणे यांच्या प्रचाराला वेग आला असून, विकासाचा ठोस अजेंडा आणि थेट जनसंपर्कामुळे त्या प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. “प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती देणे हीच माझी हमी आहे,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी प्रचारादरम्यान केले.
नंदनवन कॉलनी, सुरेश नगर, स्टेट बँक कॉलनीसह प्रभागातील विविध भागांत घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, वीज, तसेच महिलांच्या सुरक्षिततेसह नागरी सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या समस्या त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या.
गेल्या काळात प्रभागात झालेली विकासकामे आणि पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा स्पष्ट आराखडा त्यांनी मतदारांसमोर मांडला. “नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रभागातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सामावून घेणे हेच माझे ध्येय आहे,” असेही त्या म्हणाल्या.
प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. विकासाभिमुख भूमिका, सततचा जनसंपर्क आणि विश्वासार्ह नेतृत्वामुळे गायत्री इंद्रजित राणे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.









