जळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा मंगळवारपासून सुरू होताच उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांनी महापालिकेत अक्षरशः गर्दी केली. सकाळपासूनच इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी महापालिका इमारतीत हजेरी लावल्याने प्रत्येक मजल्यावर गजबजलेले चित्र पाहायला मिळाले.

प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सर्वच कक्षांबाहेर नामनिर्देशन अर्ज घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. उमेदवारांसोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असल्याने महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला. प्रवेशद्वार, दुसरा व अकरावा मजला येथे विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
दरम्यान, पहिल्याच दिवशी इच्छुकांनी तब्बल ७७७ उमेदवारी अर्जांची खरेदी केल्याची माहिती सायंकाळी प्रशासनाकडून देण्यात आली. एवढ्या मोठ्या संख्येतील अर्जविक्रीमुळे यंदाची महापालिका निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
अर्ज घेण्यासाठी आलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांची ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठीही धावपळ सुरू होती. एकीकडे अर्ज खरेदी, तर दुसरीकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना उमेदवारांची लगबग स्पष्टपणे दिसून येत होती. संपूर्ण महापालिका परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर पर्यंत आहे. मात्र गुरुवारी ख्रिसमसची सुटी आणि रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने इच्छुकांच्या हातात प्रत्यक्षात केवळ शनिवार, सोमवार आणि मंगळवार असे तीनच दिवस उरले आहेत. त्यामुळे उर्वरित दिवसांत महापालिकेत आणखी गर्दी वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेतील या गर्दीमुळे निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून, इच्छुक उमेदवारांमधील चुरस आणि उत्साह यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार ठरणार, यात शंका नाही.









