जळगाव | प्रतिनिधी
इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम–२०२५’ चे आयोजन २१ ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत जैन हिल्स, जळगाव येथे करण्यात आले आहे. लिंबूवर्गीय फळ पिकांच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने ही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची परिषद ठरणार आहे.
या सिम्पोजियमला नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस (NAAS), नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. हिमांशू पाठक तसेच कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे (DARE) सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक डॉ. एम. एल. जाट यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय देशभरातील नामवंत शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, कृषी तज्ज्ञ आणि कृषी उद्योजक या परिषदेत सहभागी होणार आहेत.
परिषदेचा उद्घाटन समारंभ रविवार, २१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात संपन्न होणार आहे. भारत हा लिंबूवर्गीय फळ उत्पादनात जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर असला, तरी हवामान बदल, कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव तसेच दर्जेदार कलमांचा अभाव यांसारखी गंभीर आव्हाने या क्षेत्रासमोर उभी आहेत.
या पार्श्वभूमीवर सिम्पोजियममध्ये होणाऱ्या तांत्रिक चर्चांमधून शाश्वत लिंबूवर्गीय शेतीसाठी मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनातील नवे निष्कर्ष आणि व्यावसायिक संधी यांवर सखोल मंथन होणार आहे. शेतकरी व कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांसाठी ही परिषद दिशादर्शक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.








