जळगाव :- राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग / संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे. त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याच्या युवा धोरणा अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार देण्यात येतात.
सन २०२३-२४ या वर्षात्त राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रिय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. युवक-युवती यांना रोख रु.५०,०००/- संस्थेस रु. १,००,०००/- तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे.
राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणा-या संस्था यांनी गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज दि१५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे.
अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणा-या संस्था यांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी केलेले आहे.