जळगांव : गिलियन बॅरे सिंड्रोम (GBS) तसेच अन्य आरोग्य संकटांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, GBS वर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी ठोस कृती आराखडा तयार करून, उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करावा. मनुष्यबळाची कमतरता असली तरी नियोजनबद्ध काम केल्यास आरोग्याशी संबंधित संकटांवर यशस्वीरित्या मात करता येईल.
डॉ. सचिन भायेकर यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन करताना, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सेवा प्रभावी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनावर घेतले, तर सकारात्मक बदल घडवता येईल, असे सांगितले.
कार्यशाळेत 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना GBS संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यात लक्षणे, उपचार, सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन झाले. जिल्ह्यात औषधसाठा पुरेसा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच ग्राम पातळीवर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण व तपासणी नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले.
GBS नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार असून, जनजागृतीसाठी तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. “स्वच्छता, शुद्ध पाणी, योग्य आहार आणि सुदृढ जीवनशैली हीच GBS नियंत्रणाची गुरुकिल्ली आहे,” असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.