रावेर लोकसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या रक्षाताई खडसे यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्याचं कळतं असून केंद्रीय मंत्रीमंडळात त्या सायंकाळी आपल्या पदाची शपथ घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.दरम्यान खडसेनां केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने समर्थकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
रक्षा खडसे यांनी तिसर्यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्याने रक्षाताई खडसे यांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती. विशेष करून त्या विजयाची हॅटट्रीक करणार्या राज्यातील एकमेव महिला नेत्या ठरल्या असून ओबीसी समुदायाच्या असल्याने त्यांच्या नावाला पसंती होती. यातच मंत्रीपदाच्या दावेदार असणार्या डॉ. भारती पवार, डॉ. हिना गावित, नवनीत राणा आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे रक्षाताई खडसे यांचा दावा अजून मजबूत झाला.
या पार्श्वभूमिवर, रक्षाताई खडसे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. अखेर आज रविवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयातून रक्षाताई खडसे यांना कॉल करून मंत्रीपदाबाबत माहिती देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या आपल्या पदाची आज शपथ घेणार असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. या माध्यमातून प्रदीर्घ काळानंतर जळगाव जिल्ह्यास मंत्रीपदाची संधी मिळणार आहे.