मुंबई, दि. 21 : बुलढाणा जिल्हयातील लोणार तालुक्यातील सोमठाणा व खापरखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात जेवणातून 208 जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. विषबाधा झालेल्या सर्वांवर वेळेत उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. तर चार रुग्णांना ग्रामीण रुग्णालय बीबी (ता. लोणार) आणि तीन रुग्णांना ग्रामीण रुग्णालय, मेहकर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा यांनी दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच नजीकच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णवाहिका प्रत्यक्ष घटनास्थळावर पाठवण्यात आल्या. त्यामुळे जिथे हरिनाम सप्ताह सुरू होतात, त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आवारात तात्काळ रुग्णांना उपचार पुरविण्यात आले. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.
विषबाधा झाल्याने उलटी जुलाब होऊन रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्यावर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जागेवरच उपचार करण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून अनेकांचे सर्वांचे प्राण वाचविले. खापरखेडा आणि सोमठाणा येथील पाणी नमुने तपासणी करिता उपजिल्हा अनुजीव तपासणी प्रयोगशाळा देऊळगाव राजा येथे पाठविण्यात आले आहेत.
गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आले. 201 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही.