जळगाव,(प्रतिनिधी): ग्रामपंचायत निवडणुकीचा हिशेब मुदतीत सादर न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील विविध पाच ग्रामपंचायतीचे ७ ग्रा.पं. सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. या सर्वच सदस्यांविरोधात संबंधित तहसीलदारांनी तक्रार दाखल केल्या होत्या त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी अपात्रतेचा निर्णय दिला.
निवडणुका कोणत्याही असोत मतमोजणी प्रक्रिया आटोपल्यानंतर सर्वच उमेदवारांना निवडणुकीचा खर्च निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. मुदतीत खर्च न सादर केल्यास १४ (ब) नुसार संबंधित ग्रा.पं. सदस्य, सरपंचाविरुद्ध तक्रार दाखल करता येते. जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या नियमावलीनुसार खर्च सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध तहसीलदार यांनी दाखल तक्रारींवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतल्या. त्यानंतर ७ सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
या ग्रामपंचायतीचे सदस्य अपात्र
म्हैसवाडी (यावल) येथील शबाना तडवी, मीना कमलाकर चौधरी, नंदगाव (अमळनेर) येथील सरुबाई अशोक पाटील, कापूसवाडी (जामनेर) देवकाबाई विजय इंगळे, ज्योती प्रभू बेलदार, अनवर्दे खुर्द (चोपडा) येथील रुख्माबाई सुभाष शिरसाठ व वराड (चोपडा) येथील मिसाबाई रेवा बारेला यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.