पाचोरा (प्रतिनिधी) –; महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेतर्फे जळगाव जिल्ह्यातील चार शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. दिनांक 11 फेब्रुवारी रोजी, धुळे येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील चार शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माजी खासदार, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची नाशिक विभागीय “शिक्षण परिषद” धुळे येथे संपन्न झाली. या परिषदेला धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. धरतीताई देवरे, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सत्यजित तांबे, नाशिक पोलीस अकॅडमी चे पोलीस उपअधीक्षक एल.एन. कानडे ज्येष्ठ समाजसेवक दिलीप दादा पाटील, धुळे येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूजाताई खडसे , संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. शिवाजीराव पाटील व प्रदेश गजेंद्र कानडे यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या शिक्षण परिषदेत पाचोरा येथील पी. के. शिंदे विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती सुषमा भानुदास पाटील यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच वरसाडे तांडा ता. पाचोरा येथील श्रीमती के. एस. पवार माध्यमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक प्रकाश परशुराम पाटील, पहूर ता. जामनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक हरिभाऊ भानुदास राऊत, आणि भारती विद्या मंदिर कासोदा, ता. एरंडोल येथील प्रदीप ज्ञानेश्वर मराठे यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गौरवण्यात आलेल्या चारही शिक्षकांचे सर्व थरातून कौतुक होत आहे. संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा शिवाजी शिंदे यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले तर प्रदेश मुख्य कोषाध्यक्ष गजेंद्र कानडे यांनी उपस्थितांचे आभार मानले उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांच्या शुभेच्छा संदेश प्राप्त झाले.